
सामना ऑनलाईन । बंगळुरू
आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनेच नववर्षाची सुरुवात झाली आहे. भाजपविरोधात महाआघाडी उभारण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकात जागावाटपावरून फटाके फुटत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसने काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली आहे. जेडीएसला एवढ्या जागा देणे काँग्रेसला शक्य नाही. कोणत्याही परिस्थितीत आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांची मदत मागितली आहे. या नेत्यांनी जेडीएसची समजूत घालावी आणि जागावाटपाची चर्चा सामोपचाराने घडवून आणावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या नेत्यांनी महाआघाडीत येणारे अडथळे दूर करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. नायडू यांनी जागावाटपाबाबत नेतृत्व करण्यास मंजूरी दिली आहे. हे तिघे नेते जानेवारीत एक बैठक घेणार आहेत. त्यात भाजपविरोधआत राष्ट्रीय महाआघाडी बनवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीच्या आधी कर्नाटकातील जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात यावा अशी जेडीएसची मागणी आहे. आम्ही जेवढ्या जागा जिंकू शकतो, त्या मागण्याचा आमचा हक्क आहे. आघाडीतील घटक पक्षांनी चर्चा करून सहमतीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे जेडीएसकडून सांगण्यात आले. राज्यात काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सर्व जागांसाठी 2:1 अशी विभागणी झाली आहे. या विभागणीनुसार आम्ही मागितलेल्या जागा मिळाल्या पाहिजे असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
जेडीएस लोकसभेसाठी 12 जागांच्या मागणीवर ठाम आहे. आपल्याला 12 जागा मिळाल्या नाहीत, तर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महाआघाडीत आमच्या प्रादेशिक पक्षाच्या क्षमता आणि ओळख कायम राहिली पाहिजे असेही ते म्हणाले. तसेच देवेगौडा यांनी चिक्काबल्लूपुरा या जागेची मागणी केली आहे. या जागेवरून काँग्रसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली निवडणूक लढवतात. जेडीएसच्या या मागणीने काँग्रेस अडचणीत सापडली आहे. महाआघाडीतील घटक पक्षांनी तर्काला धरून वास्तविकता समजून घ्यावी आणि जागावटपाची मागणी करावी, अशी अपेक्षा मोईली यांनी व्यक्त केली. जेडीएसच्या या मागणीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

























































