
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर बसवावा म्हणून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज थेट मनगुत्तीजवळ धडक मारली. कानडी पोलिसांनी अडविल्याने सीमेवरच ठिय्या आंदोलन करत शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याबाबत निर्णय घेण्यास कर्नाटक सरकारला भाग पाडले. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून लवकरच पुतळा बसविण्याची ग्वाही कर्नाटक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथील ग्रामपंचायतीने ठराव करून बसविलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविला होता. त्याचे संतप्त पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रातही सर्वत्र पसरले होते. शिवसेनेने कर्नाटक सीमारेषेवर जाऊन, कर्नाटकची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध केला होता. तसेच कर्नाटकात घुसण्याचा इशारा दिला होता. अखेर जनक्षोभासमोर झुकलेल्या कर्नाटक सरकारने मनगुत्ती गावात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 15 दिवसांत सन्मानाने बसविण्याचा निर्णय घेतला होता. पण 15 दिवस होत आले तरी पुतळ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने काहीच हालचाल केली नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही मागणी मान्य केली असताना, हा पुतळा बसविण्यात स्थानिक प्रशासनाला विलंब का? असा सवाल विजय देवणे यांनी केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तत्काळ बसविण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदार अशोक गुराणी यांना देण्यात आले.
गनिमी काव्याने घुसले
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवसैनिकांना प्रथम गडिंहग्लज पोलिसांकडून अडविण्यात आले. शिवाय कर्नाटक पोलिसांकडून चेकपोस्ट नाक्यावर कडक तपासणी करण्यात येऊ लागल्याने, गनिमी काव्याने शिवसैनिकांचा ‘लाँग मार्च’ थेट मनगुत्ती गावात कानडी पोलिसांनी अडविल्याने शिवसैनिकांनी गावाच्या वेशीवरच ठिय्या ठोकला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याने वातावरण तंग झाले होते.


























































