आता शाळेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वृत्तपत्र वाचन बंधनकारक, कर्नाटक सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व शाळांमध्ये दररोज सकाळच्या प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना किमान 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा प्रस्ताव डिसेंबर महिन्यात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून अंमलबजावणीचे निर्देश दिले.

आयोगाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सध्याच्या डिजिटल युगात मुले मोबाईलमध्ये अधिक रमत आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, ऐकण्यासंबंधी समस्या निर्माण होणे आणि  मैदानी खेळ खेळण्याची इच्छा न होणे यांसारखे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

विद्यार्थ्यांनी दररोज 10 ते 15 मिनिटे वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावल्यास भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत तर होईलच. तसेच चालू घडामोडींचे ज्ञान, शब्दसंपदा, भाषाशैली आणि लेखन कौशल्य सुधारण्यास मदत होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालकांनी सर्व शाळांना सकाळच्या प्रार्थनेनंतर दररोज 10 मिनिटे कन्नड वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. हा नियम राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसह निवासी शाळा, वसतिगृहे आणि विविध शासकीय विभागांतर्गत चालणाऱ्या बालसंवर्धन संस्थांनाही लागू असेल.

आयोगाचे माजी अध्यक्ष शशीधर बी यांनी सांगितले की, “या डिजिटल युगात दररोज घडणाऱ्या घडामोडींची माहिती मुलांना असणे आवश्यक आहे. राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि जागतिक घडामोडी यांची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. सरकारने यावर चर्चा करून निर्णय घेतला असून आता शिक्षकांनी याची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.” तसेच विद्यार्थी कोणतेही वर्तमानपत्र वाचू शकतात. मुख्य उद्देश त्यांच्यात वाचनाची सवय निर्माण करणे हा आहे असेही शशीधर यांनी सांगिते.