कर्तारपूर कॉरिडॉर यात्रेकरूंसाठी बंद

पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉर यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आला. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी गुरुद्वाराला भेट देण्यासाठी हिंदुस्थानातून सुमारे 500 यात्रेकरूंनी नोंदणी केली होती. जवळपास 100 जण सीमा ओलांडण्यासाठी आले होते मात्र कॉरिडॉर बंद असल्याने त्यांना त्यांच्या घरी परतण्याचा सल्ला देण्यात आला. कर्तारपूर कॉरिडॉर हा व्हिसा -मुक्त सीमा ओलांडणारा कॉरिडोर आहे जो पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला पंजाबमधील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक गुरुद्वाराशी जोडतो. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी त्यांचे शेवटचे दिवस येथे घालवल्याने हिंदुस्थान, पाकिस्तान आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी दरबार साहिब गुरुद्वारा हा श्रद्धेचे स्थान आहे. या ऐतिहासिक गुरुद्वारात दररोज 5000 यात्रेकरू दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात.