अमरनाथ यात्रेच्या नावाखाली कश्मीरी लोकांना त्रास, महबुबा मुफ्ती बरळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी अमरनाथ यात्रेसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. ‘आम्ही अमरनाथ यात्रेचे समर्थन करतो. परंतु सुरक्षेच्या नावाखाली कश्मीरमधील स्थानिक लोकांना याचा त्रास सोसावा लागतो’, असे महबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

यंदा एक जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. आतापर्यंत 90 हजार भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे. याच संदर्भात बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘अमरनाथ यात्रेला आमचा पाठिंबा आहे. परंतु या यात्रेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. सुरक्षेच्या नावाखाली कश्मीरमधील स्थानिक नागरिकांना या यात्रेचा त्रास सोसावा लागतो.’

फुटितावाद्यांचा कळवळा
याच दरम्यान, महबुबा मुफ्ती यांनी फुटिरतावादी नेत्यांसोबत चर्चेचा राग आळवला आहे. फुटिरतावादींचा एक गट चर्चेसाठी तयार असल्याचे बोलत आहे. फुटिरतावादी चर्चेसाठी तयार असतील तर केंद्र सरकारने ही संधी वाया जाऊ देऊ नये आणि त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करावी, असे महबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. फुटिरवाद्यांनी बुरवान वाणीच्या तिसऱ्या वर्षश्राद्धानिमित्त आज रविवारी बंद पुकारला आहे. याच दरम्यान महबुबा यांनी त्यांच्याशी चर्चेचा सूर आळवला आहे.

राज्यपाल शासनात वाढ
जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल शासनात 6 महिन्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी हा प्रस्वात मांडला होता. राज्यात विधानसभा निवडणुकीची परिस्थिती नसल्याने त्यांनी राज्यपाल शासनात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. 3 जुलैपासून या वाढीव राज्यपास शासनास सुरुवात झाली आहे.