
कश्मीरातील सफरचंदाचे व्यापारी तसेच या व्यापाराशी संबंधित चालक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून गुरुवारी रात्री शोपिया जिह्यात दोन ट्रकचालकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हे दोघे सफरचंद घेऊन जाण्यासाठी कश्मीरात आले होते. शोपियात गेल्या दहा दिवसांत सफरचंदाच्या व्यापाराशी संबंधित चौघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.
आठवडाभरापूर्वी पंजाबमध्ये एका व्यापाऱयाची हत्या झाली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री दोघा ट्रकचालकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. मोहम्मद इजियास आणि जाहिद अशी या दोघांची नावे असून मोहम्मद हा राजस्थानमधून तर जाहिद हा हरयाणातून सफरचंद घेऊन जाण्यासाठी कश्मीरात आला होता. सुरक्षा यंत्रणांची परवानगी न घेताच हे दोघे कश्मीर खोऱयात गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पंजाबचा आणखी एक चालकसुद्धा हल्ल्यात जखमी झाला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
तीन महिन्यांत 6 लाख मेट्रिक टन सफरचंदांची निर्यात
दहशतवाद्यांनी सफरचंदांच्या व्यापाऱयांना टार्गेट केले असताना गेल्या तीन महिन्यांत कश्मीरातून 6 लाख मेट्रिक टन सफरचंदांची दुसऱ्या राज्यांत निर्यात करण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली. फळांच्या निर्यातीसाठी कोणत्याही ट्रकचालकाने सरकारने ठरवलेल्या भाडय़ापेक्षा अधिक पैसे घेऊ नयेत असे निर्देशही मुख्य सचिव असगर समून यांनी दिले आहेत.


























































