
देशासह महाराष्ट्रातही ‘कोरोना’चा धोका वाढत असताना आज मुंबईत ‘कोरोना’चे आणखी चार रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात 55 कोरोना संशयितांची ‘कोरोना चाचणी’ करण्यात आली. यामध्ये चार जणांचे ब्लड रिपोर्ट ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले.
जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने मुंबईतही शिरकाव केल्याने शहरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली होती. यामध्ये आज आणखी चार रुग्णांची भर पडली आहे. हिंदुजातील रुग्णाला शुक्रवारी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या दोघा नातेवाईकांचे ब्लड रिपोर्टही शुक्रवारी रात्री उशिरा ‘कोरोना’ पॉझेटिव्ह आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कालपर्यंतचे पाच आणि आज नव्याने आढळलेले चार असे एकूण नऊ रुग्ण झाले आहेत. आज आढळलेल्या ‘कोरोना’ पॉझिटिव्ह चार रुग्णांमध्ये एक रुग्ण मुंबईचा, एक रुग्ण वाशी, एक कल्याण तर कामोठे रायगडच्या एका रुग्णाचा समावेश आहे. या चारही रुग्णांवर पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुगालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव असलेल्या देशातून प्रवास केलेले किंवा त्यांच्याशी जवळचा संपर्क आलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, सरसकट मास्क न वापरता कोरोनाची लक्षणे असली तरच मास्क वापरावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ. शहा यांनी केले. दरम्यान, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा, सर्दी-ताप असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
एका दिवसात 2912 सोसायटय़ांमध्ये तपासणी
कोरोनाची जनजागृती आणि तपासणी करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. यामध्ये आज शनिवारी एकाच दिवसात तब्बल 667 टीमच्या माध्यमातून पालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व 24 वॉर्डमध्ये 2912 सोसायटय़ांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यात आली. यामध्ये 35 हजार घरांमध्ये तपासणी करण्यात आली. याशिवाय संशयितांच्या क्लोज कॉण्टॅक्टमध्ये आलेल्यांवरही पालिकेच्या टीमकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. शिवाय फॉगिंग विभागातील 172 टीम घरोघरी जाऊन तपासणी, चौकशी, जनजागृती करीत आहेत.
‘केईएम’मध्येही होणार कोरोना चाचणी
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातही आता कोरोना चाचणीसाठी विभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र कोरोना संशयितांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयातही ‘कोरोना टेस्ट’ करण्यासासाठी विभाग सुरू करणार असल्याची माहिती डॉ. शहा यांनी दिली. या ठिकाणीही पालिकेची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे.
‘हिंदुजा’वरील धोका टळला
हिंदुजात आढळलेल्या ‘कोरोना’ रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांची ब्लड टेस्ट निगेटिव्ह आढळल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीदेखील यातील काही जणांना हिंदुजात तर काही जणांना घरच्या घरीच वेगळे राहण्यास सांगण्यात आले असून त्यांच्यावर पालिकेच्या डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सेव्हन हिल्समध्ये 300 खाटा
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 300 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी कोरोनावर उपचार करण्याची सुविधा आजपासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी तीन मेडिकल टीम, दोन मेडिकल ऑफिसर, दोन हेल्थ वर्कर्स तीन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. या ठिकाणीही एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे.
अफवा पसरवणाऱयांवर कारवाई करा
‘कोरोना’ व्हायरसबाबत चुकीची माहिती, सूचना व चुकीच्या परिपत्रकांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवांचा प्रसार होऊ नये यासाठी संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालिकेच्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक सूचनाही केल्या.
संशयित रुग्ण पळाले
नागपुरात पाच
कोरोनाची लागण सोडाच पण संशयित आहे म्हणून जरी कुणी एखाद्याला सांगितले तर तो गर्भगळीत होईल इतकी नाहक भीती लोकांमध्ये पसरली आहे. नागपूरमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने तपासणीसाठी तेथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या 5 जणांनी रुग्णालयातून पळ काढला. पोलिसांनी त्यातील तिघांना शोधून पुन्हा रुग्णालयात आणले पण दोघे जण अद्याप सापडले नसल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. मेयो रुग्णालयामधील एका स्वतंत्र कक्षात काही संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवले गेले होते. त्या रुग्णांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच इतर संशयित पुरते घाबरून गेले. त्या भीतीपोटीच त्यांनी रुग्णालयातून पळ काढला. मेयो रुग्णालय प्रशासनाने शनिवारी पहाटे पोलिसांना त्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रुग्णांच्या घरी जाऊन शोध घेतला असता तिघे जण घरीच सापडल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. इतर दोघांचा शोध सुरू आहे.
नगरमधून तीन
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज नगरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेले तीनजण पळून गेले. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नगर शहरामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. या रुग्णाच्या संपर्कातील 16 जणांचे रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. या 16 पैकी 4 जणांना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल एक-दोन दिवसांत येणार आहे. मात्र, आज यातील तिघेजण कोणालाही न सांगता जिल्हा रुग्णालयातून पळाले. ही बाब सायंकाळी लक्षात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने वरिष्ठांना माहिती दिली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
देशभरात 90 रुग्ण; दोघांचा बळी
– देशात ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या 90 वर गेली असून, 4000 जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
– देशात सर्वाधिक 20 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा 13 राज्यांत प्रसार झाला आहे. देशभरातील 84 रुग्णांमध्ये 16 जण इटलीचे आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजिवकुमार यांनी दिली.
– कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 4 हजार जणांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
‘मास्क’ सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱयांना 7 वर्षे तुरुंगवास
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाका-तोंडाला मास्क लावणे आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण देशभरात एन-95 मास्कचा आणि सॅनिटायझरचा काळाबाजार होत आहे. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने काळाबाजार करणाऱयांना 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल असे आदेश जारी केले. हा आदेश 30 जून 2020 पर्यंत लागू राहणार आहे.
विविध उपाययोजना
– महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, कॉलेज, मॉल्स, थिएटर्स सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे.
– सर्वोच्च न्यायालयात फक्त सहा खंडपीठांपुढे तातडीच्या 12 याचिकांवर 16 मार्चला सुनावणी होईल. तसेच मुंबई उच्च न्यायालयात आणि न्यायालयाच्या नागपूर, संभाजीनगर खंडपीठात यापुढेही महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार आहे. न्यायालयात गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.
– बंगळुरूत होणाऱया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
– दिल्लीतील तिहार जेलसह देशातील अनेक तुरुंगामध्ये कैद्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. आवश्यकतेनुसार तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येतील.
– देशभरात विमानतळावर साडेदहा लाख प्रवाशांची तपासणी आतापर्यंत केली आहे.
– देशाच्या 37 सीमांपैकी 19 सीमांवरील चेकपोस्ट खुले ठेवण्यात आले आहेत. हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानची बस आणि रेल्वेसेवा बंद केली आहे.
रुग्णांची संख्या
महाराष्ट्र -26, केरळ -19, हरयाणा -14, उत्तर प्रदेश -13, दिल्ली 7, कर्नाटक 6, लडाख, राजस्थान प्रत्येकी 3 रुग्ण, जम्मू-कश्मीर -2, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू येथे प्रत्येकी 1 रुग्ण आहे.
केरळमध्ये दुहेरी संकट; कोरोना आणि बर्ड फ्लू
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम असतानाच केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. मलप्पूरमधील परप्पगडी येथे बर्ड फ्लू असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आता या परिसरातील कोंबडय़ा आणि पोल्ट्री फार्मचे कनिंग केले जाणार आहे.
145 देशांमध्ये शिरकाव; 5,436 बळी
‘कोरोना’ने जगभरातील 145 देशांमध्ये शिरकाव केला असून तब्बल 1 लाख 45 हजार 634 रुग्णांना संसर्ग झाला आहे. या व्हायरसने आतापर्यंत जगभरात 5,436 जणांचा बळी घेतला आहे.

























































