नवीन कात्रज बोगदा परिसरात दुचाकी घसरून दोघा तरुणांचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम असून नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यावर दरी पुलानजीक वळणावर दुचाकी घसरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजता घडली.

अरमान  शब्बीर शेख (वय 20, रा.नाईक चाळ, बोपोडी) आणि  ॠषिकेश सुरेंद्र जाधव (वय 23, रा. गुरूदत्तनगर, पिंपळे गुरव) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

दोघेही मित्र गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून पुण्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर दरी पुलापासून काही अंतरावर भरधाव वेगात असलेल्या शेखची दुचाकी वळणावर घसरली.

त्यामुळे शेख आणि सहप्रवासी जाधव यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या