
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे कपल 9 डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवाडा येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये त्यांच्या शाही विवाह सोहळ्याला शानदार सुरुवात झाली असून मंगळवारी संगीत सेरेमनी पार पडली.
विकी-कतरिनाच्या व्हीव्हीआयपी लग्न सोहळ्यात फक्त त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमंडळींना एंट्री असणार आहे. लग्नाचे फोटो, व्हिडीओ लीक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांनी लग्नाच्या फोटो-व्हिडीओचे अधिकार एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिल्याची चर्चा आहे. आता एका ओटीटी प्लॅटफॉर्मनेदेखील कतरिना आणि विकीला शंभर कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा आहे. ही कंपनी दोघांच्या लग्नाचे व्हिडीओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्याचा विचारात आहे. पाश्चिमात्य देशात हा ट्रेंड कॉमन आहे हाच ट्रेंड हिंदुस्थानात आणण्याच्या विचारात कंपनी आहे. त्यांनी ही ऑफर स्वीकारली तर या लग्नाचे सर्व फंक्शन्स ओटीटीवर स्ट्रीम केले जातील.
कतरिनाच्या हातावर रंगणार जगप्रसिद्ध सोजत मेहंदी
संगीत सेरेमनीनंतर बुधवारी मेहंदी सोहळा होणार आहे. कतरिनाच्या हातावर जगप्रसिद्ध सोजत मेहंदी रंगणार आहे. त्यासाठी राजस्थानच्या सोजतमधून 20 किलो ऑर्गनिक मेहंदी पावडर आणि 400 कोनची ऑर्डर देण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे आम्ही ऑर्गनिक मेहंदी पाठवली आहे. त्यासाठी आम्ही कोणतेही पैसे आकारले नाहीत. आमच्याकडून त्यांच्यासाठी हे स्पेशल गिफ्ट असणार आहे, असे स्थानिक मेहंदी विक्रेते नितेश अग्रवाल यांनी सांगितले. लग्नानंतर 10 डिसेंबरला पार्टी होईल त्यानंतर विकी आणि कतरिना मुंबईत परतल्यावर इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शन आयोजित करतील.