
सामना प्रतिनिधी । नांदेड
शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी 15 डिसेंबर रोजी हिंदी कवीसंमेलन व 16 डिसेंबर रोजी प्रख्यात कलावंत आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज गोदावरी महोत्सव समितीची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सचिन किसवे, माजी शहरप्रमुख बिल्लू यादव, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ काळे आणि गुरमितसिंघ टमाणा तसेच दयाल गिरी यांची यावेळी उपस्थिती होती.
माहिती देताना सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे व प्रकाश मारावार यांनी सांगितले की, शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन वर्षापासून विविध कार्यक्रम घेण्यात येतात. संयोजन समितीने यावर्षी दोन दिवसीय गोदावरी महोत्सव आयोजित केला असून, गोदावरी नदीकाठावर बंदाघाट येथे 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदी कवीसंमेलन होणार आहे. यात हिंदुस्थानातील नामवंत कवी सामील होणार आहेत. यात नवीदिल्लीच्या कवयित्री पद्मीनी शर्मा, ढोलपूरचे हास्य कवी रामबाबू सिकरवार, उत्तरप्रदेशचे प्रख्यात कवी पी.के.धूत, टिकमगडचे कवी अनिल तेजस्व, चित्तोडगड येथील कवी शांती तुफान, जयपूर येथील वीररस कवी अशोक चारण, उत्तरप्रदेशचे सुरेंद्र यादवेंद्र, मध्यप्रदेश देवासचे कवी शशिकांत यादव या दिग्गज कवींचा समावेश आहे. या कविसंमेलनाचे सूत्रसंचलन शशिकांत शशी हे करणार आहेत. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे लाडके भावजी होममीनिस्ट फेम आदेश बांदेकर यांचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला व महिला वर्गात लोकप्रिय ठरलेला खेळ मांडीयेला हा विशेष कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता गोदावरी नदीकाठावरच बंदाघाट येथे होणार आहे. वेगवेगळे खेळ, किस्से, गप्पा, गाणी असा हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. यासोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने अनवाणी पायाने फिरणाऱ्या शाळेतील गोरगरीब विद्याथ्र्यांना बूट व पायमोजे वाटप करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 15 हजार विद्याथ्र्यांना त्याचे वाटप केले जाईल, अशीही माहिती संयोजकांनी दिली.

































































