कवठे येमाईत चोरट्यांचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूरच्या पश्चिम भागात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरटयांनी शेताजवळ वस्तीत राहणाऱ्यांना लक्ष्य केलं. गावठाणा नजीक फत्तेश्वर रोडला राहणारे नूरमहंमद पठाण (65 ) व त्यांची पत्नी जैतुन पठाण (60) झोपेत असताना चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करत त्यांनी या दांपत्याला मारहाण केली.

घरातील रोख 5 हजार व 3 तोळे सोने असा ऐवज लांबवला. नूरमहंमद पठाण यांच्या छातीवर चोरटयांनी गज मारल्याने ते गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नीसही चोरटयांनी हाताने मारहाण केली.

तर मंचर रोड नजीक शेतात राहणारे प्रकाश गणाजी इचके यांच्या घराची पश्चिमेकडील सिमेंटची खिडकी तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. दोघा पती पत्नीला दमबाजी केली. त्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त करत दोन तोळे सोने व रोख रक्कम असा सुमारे साठ हजारांचा ऐवज चोरटयांनी पळवला.

येथील भारत भोर यांच्या श्रीराम दूध संकलन केंद्रातही चोरटयांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडत तेथील ऑफीसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पण आतील मुख्य केबीनमध्ये एक जण झोपला असल्याचे पाहून चोरटे तेथून लगेचच पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कवठे येमाईत येत पठाण कुटुंबीयांची भेट घेतली. शिरूरच्या पश्चिम भागात मागील काही दिवसात सातत्याने होत असलेल्या चो-या रोखण्यात पोलीस प्रशासनास अपयश येत असून नुसतेच गुन्हे दाखल करून जमणार नाही तर पोलिसांनी झालेल्या सर्वच चो-यांचा छडा लावून यातील गुन्हेगारांना तातडीने अटक केली पाहिजे.चोरटयांची मोठी टोळी असण्याची शक्यता असल्याने या चोरयांचा पोलिसांनी तातडीने छडा लावण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली आहे.