KCR यांनी स्वत:च्या मुलीचीच पक्षातून केली हकालपट्टी! नक्की कारण काय?

तेलंगणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी स्वत:ची मुलगी के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन केल्यामुळे के. कविता यांना निलंबित करण्यात आले आहे.

भारत राष्ट्र समितीने एक निवेदन जारी करत विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पक्षविरोधी कारवाया बीआरएससाठी हानीकारक असून पक्षनेतृत्व यावर गांभीर्याने विचार करत आहे. के. कविता यांचे सध्या वर्तन आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना पक्षातून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीआरएसने निवेदनामध्ये म्हटले आहे.