
देशात केंद्रातील मोदी सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी राजकीय एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्या रविवारी मुंबईत येणार आहेत. या भेटीत भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच राजकारणाची पुढील दिशा याबाबत चर्चा होण्याचा शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले होते. ते स्वीकारून केसीआर हे रविवार, 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच केसीआर हे मोदी सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरुद्ध छातीठोकपणे बोलतात. देशात मोदी सरकारविरोधी मोट बांधली जात आहे. त्यासाठी बिगरभाजपशासित राज्यांना एकत्र आणण्यासाठी केसीआर यांनी पुढाकार घेतला आहे. केसीआर यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीमुळे राज्य सरकार आणि विरोधीपक्षांची एकजूट करून देशपातळीवर भाजपविरोधी दबावगट तयार करण्याचा प्रयत्नांना अधिक गती मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
केंद्रातील भाजप सरकार हे राज्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे, असे केसीआर म्हणाले होते. देशाला दारिद्र्यात ढकलणाऱया भाजपला मुळापासून उपटून फेकण्यासाठी क्रांतिकारी बदल होण्याची गरज आहे आणि त्यासाठी देशव्यापी चळवळ उभारण्यास हीच योग्य वेळ असल्याचेही ते म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांनी भाजपविरोधात पुकारलेल्या लढय़ाचे कौतुक करत त्यांना यापुर्वीच पाठींबा दिला आहे. त्यामुळे या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नवी राजकीय समीकरणे
देशात सद्या वेगवेगळी राज्ये आणि केंद्रातील सरकार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारचा बिगरभाजपशासित राज्यांबाबतचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिला. केंद्राची मदत, राज्यांचे हक्क किंवा केंद्राचा हस्तक्षेप यावरून केंद्र व या राज्यांमध्ये नेहमीच तीव्र मतभेद होतात. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या दोन नेत्यांच्या भेटीने नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वी तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह भाजपविरोधातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे.
































































