
निवडणुका आल्या की ठाण्यात मिंधे गटाला धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण येते. त्यांच्या नावाने मते मागितली जातात. मात्र आनंद दिघे यांच्या नावाने उभे असलेले ठाण्यातील प्रवेशद्वार कुठे गायब झाले, ते गायब कुणी केले, धर्मवीरांच्या नावाचे प्रवेशद्वार पुन्हा उभे राहणार का, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आज उपस्थित केला.
ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाने बहुमताने सत्ता काबीज केली आहे. असे असले तरी शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ठाणे-मुलुंड या मुख्य रस्त्यावर आनंदनगर तसेच एलबीएस मार्गावर असलेले स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार अद्याप भव्य स्वरूपात का उभारले जात नाही, असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान महानगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे गट या प्रश्नावर भूमिका घेत नसल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह
मागील अनेक वर्षांपासून ठाणेकर नागरिक या प्रवेशद्वाराच्या पुनर्बाधणीची मागणी करत आहेत. पूर्वी या ठिकाणी असलेले प्रवेशद्वार आता अधिक भव्य आणि देखण्या स्वरूपात असावे, अशी लोकभावना आहे. मात्र सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केदार दिघे यांनी केला असून सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आता तर महापालिकेत सत्ताधारी बहुमताने निवडून आले आहेत. नगरसेवक सभागृहात बसले आहेत आणि महासभाही नियमित सुरू झाल्या आहेत. मग आता तरी आनंद दिघे यांच्या नावाचे हे भव्य प्रवेशद्वार बांधण्यास सुरुवात होणार का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुख्य प्रवेशद्वार पुन्हा भव्य स्वरूपात बांधण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ठाण्यातील सामान्य नागरिक या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
निवडणुकीत यश मिळवूनही महत्त्वाच्या प्रकल्पांना मुहूर्त लागत नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान भव्य प्रवेशद्वारासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.



























































