सुखी माणसाचा ‘दसरा’;  छोटय़ा पडद्यावर सीमोल्लंघन, कलर्स मराठीवर आजपासून नवी मालिका

टीआरपी वाढवण्यासाठी टिव्ही मालिकेतून कटकारस्थान, विवाहबाह्य संबंध आणि सासू सुनेची धुसफूस या नको त्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत. अशातच उद्या दसऱ्य़ाच्या मुहूर्तावर छोटय़ा पडद्यावर सीमोल्लंघन होणार असून कलर्स वाहिनीवर ’सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका सुरू होणार आहे. प्रत्येक मराठी माणसाला आपली वाटणारी आणि त्यांच्या घराचे प्रतिबिंब दाखवणारी अशी ही मालिका आहे. सुखाची परिभाषा उलगडून सांगणाऱ्य़ा आणि सुखाचा मार्ग दाखवणाऱ्य़ा मालिकेमुळे उद्याचा दसरा खऱ्य़ा अर्थाने सुखी माणसाचा ’दसरा’ ठरणार आहे.

सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता जे आहे त्यात सुख मानलं पाहिजे. याची जाणीव करून देण्यासाठी चिमणराव आणि त्यांचे कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. केदार शिंदे यांच्या स्वामी क्रिएशन्स निर्मित आणि दिग्दर्शित ’सुखी माणसाचा सदरा’ 25 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता आणि 26 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. केदार शिंदे या मालिकेद्वारे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करणार असून अभिनेता भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, विजय पटवर्धन हे कलाकार मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत.

2001 साली टेलिव्हिजनवर प्रदर्शित झालेली ’श्रीयुत गंगाधर टिपरे मालिका’ अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्या पिढीचे प्रेक्षक अशा मालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासोबत आता पुढच्या पिढीलाही ’सुखी माणसाचा सदरा’ मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांत सगळ्यांच्या आयुष्यात खूप काही घडले. खूप नकारात्मक आजूबाजूला आली.. या साऱ्य़ावर हलकंफुलकी, सकारात्मक विचार देणारी ही मालिका आहे.

हा तर घरातील आरसा

सुखी माणसाचा सदरा प्रत्येकाच्या कपाटात असतो. फक्त तो काढून घालायचा असतो. हा सदरा आपल्या माणसाच्या सहवासात आहे, आजीच्या प्रेमात आहे, नात्यांमध्ये आहे. सुखी समाधानी राहण्याचं रहस्य कळलं की प्रत्येक माणूस आनंदी होईल यात शंका नाही. ही मालिका बघत असताना प्रत्येक माणूस स्वतःला, स्वतःच्या घटनांना या मालिकेशी जोडू शकेल. म्हणून हा आपल्या घराचा आरसा ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या