आमच्या बेटांपासून दूर रहा; चीनचा अमेरिकेला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

चीन आणि अमेरिकेत व्यापारसंघर्षातून वाढलेला तणाव कमी करण्यासाठी शनिवारी दोन्ही देशांत उच्चस्तरीय बैठक झाली. दक्षिण समुद्रात आपल्या बेटांजवळ अमेरिकेने त्यांच्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने पाठवू नये, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी झिनफिंग यांच्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. त्यात चीनने अमेरिकेने कठोर शब्दांत इशारा दिल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांतील राजनैतिक अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. चीनच्या इशाऱ्याला न जुमानता अमेरिकेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार परवानगी असलेल्या भागात लढाऊ विमाने, युद्धनौका यांची गस्त अमेरिका सुरू ठेवेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि चीनच्या युद्धनौका चीनी समुद्रात एका बेटाजवळ समोरासमोर आल्या होते. त्यानंतर दोन्ही देशांनी चर्चेतून तणाव कमी करण्यावर भर दिला होता. दोन जागतिक महासत्तांमधील संघर्ष धोकादायक ठरू शकतो.त्यामुळे मतभेद दूर सारून लष्करी आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे.

चीनशी व्यापारयुद्ध संपवण्यासाठी अमेरिका कोणताही दबाव आणत नसल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी चीनने जबाबदार आणि निष्पक्ष भूमिका स्विकारावी असे अमेरिकेने म्हटले आहे. ही बैठक पेइंचिंगमध्ये गेल्या महिन्यात होणार होती. मात्र, दोन्ही देशांच्या युद्धनौका समोरासमोर आल्याने तणाव वाढत असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली होती. अमेरिकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत चीन समुद्री हद्दीत असुरक्षित आणि आक्रमक संचार करत असल्याचे म्हटले होते.