बेस्टच्या ताफ्यात 3 हजार 337 बसेस कायम ठेवा! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

बेस्ट उपक्रमाकडे सध्या स्वतःच्या मालकीच्या फक्त 1 हजार 686 बसेस आहेत. या बसेसही 2025 नंतर वाहतुकीतून बाद करण्यात येणार आहेत. त्यानंतर बेस्टकडे स्वतःच्या मालकीची एकही बस शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केलेल्या कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या 3 हजार 337 बसेस कायम ठेवाव्यात. त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने तातडीने बसेसची खरेदी करावी, अशी मागणी माजी बेस्ट अध्यक्षांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे आज केली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस संपुष्टात येत असल्याबद्दल  राज्यपालांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. स्वमालकीच्या बसेस घेण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आज बेस्टचे माजी अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष उमेश सारंग, मनोहर जुन्नरे, गणेश शिंदे यांनी महापालिका आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले. 11 जून 2019 साली तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केलेल्या करारानुसार, मुंबई महापालिकेने 100 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला तातडीने द्यावेत. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी असून ती टिकवणे ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे, अशी आग्रही मागणीही शिष्टमंडळाने केली. दरम्यान, आयुक्तांनी बेस्टच्या मालकीचा ताफा 3 हजार 337 कायम ठेवण्यासाठी निधीची पूर्तता करण्यात येईल. त्याबाबत राज्य शासन आणि पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.