
आपल्या आहारामध्ये सर्व पदार्थांचा समावेश असणे हे खूप गरजेचे आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पानातील डाव्या बाजूचे असणारे लोणचे. जेवणात गोड आणि आंबट लोणचे नसल्यास ते अपूर्ण वाटते. लोणचे हे हिंदुस्थानींच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. लोणच्यामुळे तोंडाला चव येते. शिवाय लोणचे खाण्याचे फायदेही भरमसाठ आहेत.
लोणचे खाण्याआधी काही गोष्टी मात्र लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. लोणचे योग्यरित्या जतन केले नाही तर, ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरते. लोणच्यातून ‘बोटुलिझम’ नावाचा बॅक्टेरिया विषारी पदार्थ सोडला जातो. हे विष ‘पॅरालिसिस’ सारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. इतकेच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील ठरू शकते. म्हणूनच लोणचे खाण्यापूर्वी या गोष्टी न विसरता लक्षात ठेवायला हव्यात.
नेहमी स्वच्छ भांडे वापरा
लोणचे साठवता तेव्हा ते नेहमी स्वच्छ किंवा निर्जंतुक केलेल्या भांड्यात साठवा. लोणच्यासाठी काचेचे भांडे सर्वोत्तम मानले जातात. कारण प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये रासायनिक धोका असतो, तर धातूच्या भांड्यांमध्ये काही प्रकारची प्रतिक्रिया होऊ शकते. प्रथम काचेचे भांडे गरम पाण्याने धुवा, नंतर ते पूर्णपणे सुकल्यानंतरच त्यात लोणचे साठवा. यामुळे कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका कमी होईल.
तेल आणि व्हिनेगरचे प्रमाण योग्य ठेवा
लोणच्यामध्ये तेल आणि व्हिनेगरचे प्रमाण देखील नेहमीच योग्य ठेवावे. तेल किंवा व्हिनेगरचे प्रमाण कमी असेल तर लोणच्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. कधीकधी वरच्या भागात हवेमुळे लोणच्यामध्ये बुरशीचा धोका देखील वाढू शकतो. म्हणून तेल आणि व्हिनेगरचे प्रमाण तपासत राहा आणि ते पुरेसे ठेवा असा सल्ला देतात.
तुम्हाला हे बदल दिसले तर लोणचे ताबडतोब फेकून द्या
लोणच्यामध्ये काही बदल दिसले, तर ते ताबडतोब फेकून द्या. उदाहरणार्थ तुमच्या लोणच्याचा रंग अचानक बदलला असेल, त्यात एक विचित्र वास येऊ लागला असेल किंवा तुम्हाला लोणच्याच्या भांड्यात गॅसचे बुडबुडे दिसत असतील. अशा कोणत्याही स्थितीत, तुम्ही लोणचे ताबडतोब फेकून द्यावे अन्यथा ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.