केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, गरीब विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल सरकारने आता दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना आणली आहे. यानुसार गरीब विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेल्या घोषणेनुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या फीच्या 100 टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जेवढी फी शाळेत देईल तेवढीच रक्कम त्याला शिष्यवृत्तीच्या रूपाने परत मिळणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापासून अडीच लाख रुपयांपर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय फी रकमेच्या 50 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख ते सहा लाख रुपये आहे त्या विद्यार्थ्यांना फी रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळणार आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल 94 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे.