
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘आप’चे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माझ्या वडिलांकडून सहा कोटी रुपये घेऊन लोकसभेची उमेदवारी दिली. केजरीवाल यांनी चक्क लोकसभेचे तिकीट विकले असा सनसनाटी आरोप ‘आप’चे उमेदवार बलबीर जाखड यांच्या मुलाने केला आहे. दिल्लीत रविवारी सात मतदारसंघांत मतदान होत असून तत्पूर्वीच आम आदमी पक्षावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम दिल्लीतून आम आदमी पक्षाने बलबीर जाखड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा मुलगा उदय जाखड याने माझ्या वडिलांनी केवळ तीन महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता. आपण पैसे देऊन उमेदवारी मिळविली असे त्याने म्हटले आहे. मात्र बलवीर जाखड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.


























































