केळशीत पावसाचा कहर कधी नव्हे ते घरांमध्ये पाणी शिरले, मार्गही झाले बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केळशीत पावसाचा कहर कधी नव्हे ते बाजारपेठ, कुभावाडयात, रथवाडीत नवानगरातील घरांमध्ये पावसाच्या पूराचे पाणी शिरले, उभाआगरातील बिदी पाण्याने पुर्णपणे भरल्याने अनेकांच्या घरांकडे जाण्याचा मार्ग बंद झाला. तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने मार्ग बंद होण्याचे प्रकार घडले यावर्षीच्या पावसाळी हंगामातील सर्वांत जास्तीचा पाऊस रविवारी केळशीत झाल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली.

दापोली तालुक्यातील केळशी या निसर्ग सुंदर आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या गावात रविवारी कोसळलेल्या पावसाने अनेकांच्या घरात कधी नव्हे ते पाणी शिरले. केळशी बाजारपेठेतील राजेंद्र प्रतापमल जैन यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोरील रस्ता पाण्याने दुथडी भरून वाहत होता. त्यामुळे वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहनांचा मार्ग काढणे जिकरीचे झाले होते. यातच केळशी बाजारपेठेतील सर्वात जुने किराणा मालाच्या विक्रीचे फर्म असलेल्या कोठारी ब्रदर्स अर्थात नरेंद्र कोठारी यांच्या किराणा मालाच्या दुकानाच्या गोदामात पाणी शिरल्याने किंमती माल भिजला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नरेंद्र कोठारी हे राज्याबाहेर फिरतीसाठी गेल्याने काही नुकसान झाले आहे का ? याची पडताळणी करता आलेली नसली तरी मोठेच आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. कुंभारवाडा येथील घरांमध्ये कधी नव्हे ते पाणी शिरल्याने रहीवाशांचीही मोठीच पंचाईत झाली, तर उभाआगर येथील बिदी पाण्याने ओसंडून वाहू लागल्याने उभा आगरातील घरांकडे जाण्याचा मार्ग पुर्णपणे बंद झाला होता. परांजपे आळीतील परिस्थितीही काही वेगळी नव्हती, गुजरवाडा मदनतडी रथवाडी या भागातही पाणी वाढल्याने लोकांची मोठीच गैरसोय झाली. तर केळशी गावाला लागूनच असलेल्या उंबरशेत या महसुली गावातील नवानगरात सदानंद मिसाळ यांच्या घरात पाणी शिरल्याने किंमती इलेक्ट्रॉनिक वस्तु पावसाच्या पाण्याने पार भिजून गेल्या आहेत. नवानगरातीलच सखाराम चिमण यांच्याही घराचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. नवानगराचा काही भाग उंच टेकडीवर असल्याने टेकडीवरील माती कोसळून जाण्या येण्याच्या मार्गावर मातीचा भराव साचला आहे.

केळशीचा इतिहास पाहता असा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता. तो रविवारी कोसळला त्यामुळे केळशीवासींयाना आर्थिक नुकसानीची चांगलीच झळ पोहोचली. निसर्ग चक्री वादळातील आपत्तीने झालेल्या आर्थिक नुकसानीच्या संकटातून कुठे परत मुळ पदावर येत नाहीत तोच पुन्हा एकदा कोळशीवासीयांना आपत्तीचा सामना करावा लागला असल्याने केळशी वासीय हवालदिल झाले आहेत. दरम्यान तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) यांच्या सूचनेने महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे सूरू करण्यात आले असून सोमवारी किंवा मंगळवारी नुकसानाची खरी आकडीवारी समजेल.