
मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपअधिष्ठातांसाठी असलेल्या दालनामध्ये महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी घुसखोरी केली आहे. त्या घुसखोराला बाहेर काढण्यात यावे, अशी सूचना शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत मांडली.
मुंबई महानगरपालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालयांच्या बांधकामासंबंधी कामे व इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी दुसऱया विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त कार्यभार देऊन सोपवण्यात आली आहे. संबंधित सहाय्यक आयुक्तांना महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वतंत्र सुसज्ज दालन उपलब्ध असतानाही आठवडय़ातील केवळ चार तास काम करण्यासाठी केईएम रुग्णालयातील सहाय्यक आयुक्तांपेक्षा उच्च पदावर पूर्ण वेळ कार्यरत असलेल्या महिला उपअधिष्ठातांवर दालन सोडण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले आहे, ही बाब आमदार पोतनीस यांनी नियम 93 अन्वये सभागृहात मांडली.
या महिला उपअधिष्ठाताने दालन सोडण्यास नकार दिल्याने रुग्णालय प्रशासनासनाने तिला धमकावत बेकायदेशीरपणे त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे, असे पोतनीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या महिला उपअधिष्ठातांची बदली रद्द करावी, अशीही मागणी त्यांनी केली.






























































