केनियाच्या किपचोगने रचला इतिहास पण…

455

ऑलिम्पिक व जागतिक या मानाच्या स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱया केनियाच्या 34 वर्षीय इलिउड किपचोग याने शनिवारी इतिहास रचला. त्याने येथे पार पडलेली मॅरेथॉन शर्यत 1 तास 59 मिनिटे आणि 40 सेकंदांत पूर्ण केली. पूर्ण मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो पहिलाच धावपटू ठरलाय. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील प्रॅटर पार्क येथे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉनमध्ये संस्मरणीय कामगिरी केल्यानंतर इलिऊड किपचोग भावुक झाला. तो म्हणाला, मी धावलो इतिहास रचण्यासाठी. मानवाला कोणत्याही मर्यादा नसतात हे दाखवून दिले. तसेच बर्लिनमधील विश्वविक्रम आणि व्हिएन्नामधील कामगिरी याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, दोन्ही मॅरेथॉन पूर्णपणे भिन्न आहेत. बर्लिनमध्ये विश्वविक्रम रचला अन् आता व्हिएन्नामध्ये इतिहास घडवण्यात यश मिळाले.

41 पेसमेकर्समुळे रेकॉर्ड बुकात नोंद नाही
केनियाच्या धावपटूने सर्वस्व पणाला लावत विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. पण आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स फेडरेशन (आयएएफएफ) यांच्याकडून या विक्रमाची नोंद बुकात करण्यात येणार नाही. कारण इलिउड किपचोग याला तब्बल 41 पेसमेकर्सनी धावताना मदत केली. हा नियम आयएएफएफच्या बुकात बसत नाही. मात्र यानंतरही दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या