
जगभरातील काही देशांबरोबरच आपल्या देशातही तृतीयपथीयांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या समाजात तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाहीये. त्यामुळे अशा व्यक्तींना अलिप्त आयुष्य जगावे लागत आहे. पण केरळमधील अॅडम हॅरी (Adam Hary) या वीस वर्षीय ट्रांसजेंडर तरुणाने व्यावसाय़िक पायलटचे प्रशिक्षण घेत लायसन्स मिळवले असून लवकरच तो आकाशात उंच भरारी घेणार आहे. यासाठी त्याला केरळ सरकारने आर्थिक मदत केली आहे.
तृतीयपंथीय असल्याने हॅरीला घरातल्यांनी हाकलून लावले होते. पण बुद्धीने तल्लख व अभ्यासू असलेल्या हॅरीने हिंमत दाखवली. अनेक रात्री त्याने बेवारस असल्यासारख्या रेल्वे स्टेशनवर काढल्या. कोणी जे दिले ते खाऊन पोटाची खळगी भरली. त्यानंतर तो ऐर्नाकुलम येथे गेला. तिथे त्याने एका ज्यूसच्या दुकानात काम केलं. पण तो ट्रान्सजेंडर असल्याने मालक त्याला कमी पगार द्यायचा. अशातच एक दिवशी हॅरीची ओळख दुसऱ्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीबरोबर झाली. त्याने हॅरीला थोडीफार मदत केली. नंतर हॅरी विमान अॅकेडमीमध्ये पार्टटाईम नोकरी करू लागला. तिथे गेल्यावर आपणही पायलट बनावं असा निर्णय हॅरीने घेतला. तोपर्यंत हॅरीची चिकाटी, कामात असलेले त्याचे स्वारस्य बघून त्याला काहीजणांनी पायलटचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हॅरीने तिरुवंतपुरम मधील राजीव गांधी एविएशन टेक्नोलोजी मधुन पायलटचे प्रशिक्षण घेतले. मिडीयाने याबद्दल छापल्यानंतर बाल कल्याण विभागाने हॅरीला नोकरी दिली. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी त्याला चांगल्या अॅकेडमीत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. पण फि भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने ट्रांसजेंडर न्याय बोर्डात स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. अर्ज मंजुर झाला. त्यानंतर राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ अॅविएशन एंड टेक्नोलॉजी अॅकेडमीत प्रवेश घेतला यासाठी केरळ सरकारने त्याला मदत केली आणि हॅरीच पायलट होण्याच स्वप्न पू्र्ण झालं आहे.
























































