आमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवा,नाहीतर आम्ही मरू, साश्रूनयनांनी मांडली आमदाराने व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोची

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून या पावसाने आता पर्यंत ३२४ जणांचे बळी घेतले आहेत. लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफचे दल दिवस रात्र बचावकार्य करत असून आतापर्यंत दोन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी बचाव पथके पोहोचले नसून त्या भागातील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहे. केरळमधील चेंगान्नूर भागातही अद्याप मदत पोहोचली नसून येथील आमदाराने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ढसाढसा रडत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

सीपीआयचे चेंगान्नुर येथील आमदार साजी चेरियन यांनी एका मल्याळम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते ढसाढसा रडले आहेत. ‘प्लीज कुणीतरी या भागात हेलिकॉप्टर पाठवा, मोदींपर्यंत माझा निरोप पोहोचवा. मी तुमच्याकडे मदतीची भीक मागत आहे. जर वेळीच मदत नाही पोहोचली तर आम्ही मरून जाऊ. इथून लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. आम्हाला एअरलिफ्ट करूनच तुम्ही वाचवू शकता. आम्ही हेलिकॉप्टरसाठी पैसेही द्यायला तयार आहोत. केंद्र सरकार आम्हालाा का मदत करत नाही. आम्हाला जेवणाचे पुरेसे पॅकेट्स मिळालेले नाहीत. जर हे असेच राहिले तर इथले ५० हजार लोकं मरतील. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर आम्हाला मदत पाठवा’ असे आवाहन साजी चेरियन यांनी केले आहे.

अल्लापुझा जिल्ह्यातील चेंगान्नुर भागही पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. केरळमधील सर्वात जास्त बाधित भागांपैकी हा एक भाग आहे. मात्र अद्यााप इथे मदत पोहोचलेली नाही. हा भाग जंगलाने वेढलेला असून तेथे पोहोचण्यास बचाव कार्याला अद्याप शक्य झालेले नसल्याची माहिती शुक्रवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली होती.