
केरळमधील पलक्कड जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकत्र्याची हत्या करण्यात आली. या घटनेच्या काही तासांपूर्वीच जिल्ह्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. केरळमध्ये 24 तासांत दोन राजकीय हत्येने खळबळ उडाली आहे.
एस. के. श्रीनिवासन (45) असे आरएसएसच्या या कार्यकर्त्याचे नाव असून, त्यांच्यावर सहा सदस्यांच्या टोळीने मेलमुरी येथील त्यांच्या मोटारसायकल दुकानात हल्ला केला. त्यानंतर दुपारी स्थानिकांनी आजूबाजूच्या भागांतील दुकाने बंद केली. दरम्यान, पोलिसांनी येथील सुरक्षा वाढवली आहे. जवळच्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोर तीन मोटारसायकलवरून दुकानात पोहोचले होते. तिघांनी श्रीनिवासन यांच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय साखरे हे पलक्कड शहरात दाखल झाल्यानंतर दोन राजकीय हत्यांच्या तपासाच्या दृष्टीने त्यांनी तपास सुरू केला आहे. केरळ सशस्त्र पोलीस-1 च्या तीन कंपन्यांना पलक्कड येथे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षा उपायांचा भाग म्हणून सशस्त्र पोलीस बटालियनचे सुमारे 270 सदस्य पलक्कड येथे तळ ठोकून आहेत. दरम्यान, आदल्यादिवशी झालेल्या सुबैर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी संघाच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना जिल्ह्यातील एलाप्पल्ली येथे सुबैर (43) यांची कथितरीत्या हत्या करण्यात आली होती.



























































