भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी पीएफआय संघटनेच्या 15 जणांना फाशीची शिक्षा

भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी केरळमधील न्यायालयाने 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सगळे आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी निगडीत आहेत. 2021 साली डिसेंबर महिन्यात रणजित यांची हत्या करण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सरकारी वकिलांनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. रणजित यांची हत्या त्यांची आई, बायको आणि मुलाच्या डोळ्यादेखत करण्यात आली होती. सदर प्रकरण हे रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अतिदुर्मिळ स्वरुपाचे असल्याने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांचा या हत्येमध्ये हात असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले होते. 20 तारखेला 15 जण दोषी असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला होता आणि निर्णय 30 जानेवारीपर्यंत राखून ठेवला होता. 19 डिसेंबर 2021 रोजी रणजित यांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी रणजित यांना घरासमोरच बेदम मारहाण केली होती आणि नंतर त्यांना ठार मारलं होतं.