
वैवाहिक जीवनातील पती-पत्नीमधील नातेसंबंध आणि विश्वासाबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण भाष्य केले आहे. जर पती त्याच्या पत्नीवर निष्कारण संशय घेत राहिला तर अशा वृत्तीचा वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होईल, किंबहुना वैवाहिक जीवनाचे नरकामध्ये रुपांतर होऊ शकते. पतीने पत्नीवर संशय घेणे हादेखील एक मानसिक छळाचा गंभीर प्रकार आहे, अशी टिप्पणी केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केली. याचवेळी पतीच्या वर्तनावर ताशेरे ओढत न्यायालयाने महिलेला संशयखोर पतीपासून घटस्फोट मंजूर केला.
न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि न्यायमूर्ती एम.बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने कोट्टायम कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत महिलेला दिलासा दिला. पत्नीलाही मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. वैवाहिक जीवनात विश्वासाची जागा जेव्हा संशय घेतो तेव्हा नातेसंबंध त्याचे सौंदर्य गमावते. पतीचे असे वर्तन मानसिक क्रूरता असून अशा परिस्थितीत पत्नीकडून नाते टिकवून ठेवण्याची अपेक्षा करता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
 
             
		





































 
     
    





















