कोणी शेण म्हटले तर राग येत नाही, अभिमान वाटतो; भाजप खासदाराचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मल्याळम अभिनेते आणि भाजपचे राज्यसभेतील खासदार सुरेश गोपी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये गो संरक्षण यात्रेदरम्यान गोपी यांनी हे वक्तव्य केले आहे. कोणी आपल्याला शेण म्हटले तर त्याचा राग येत नाही, उलट त्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गोपी यांनी म्हटले आहे.

श्रीनारायण गुरु यांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांनाही गोमयचा स्पर्श करण्यात आला होता. त्यामुळे गोमय म्हणजेच शेण किती पवित्र आहे, याची कल्पना येते, असे ते म्हणाले. त्यामुळे कोणी आपल्याला शेण म्हटले तर त्याचा राग येत नाही किंवा लाजही वाटत नाही, उलट आपल्याला त्यांनी पवित्र नावाने संबोधल्याचा अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले.

विश्व हिंदू परिषेदकडून आयोजित करण्यात आलेल्या गो संरक्षण यात्रेत गोपी सहभागी झाले होते. गोपी यांनी त्यांच्या एका चाहत्याला दिलेल्या उत्तरात हे वक्तव्य केले आहे. मल्याळम ब्लॉगर बुल जेट ब्रदर्स यांच्यावर वाहन संरक्षण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावर त्यांच्या चाहत्याने गोपी यांनी मदत करावी, अशी विनंती केली होती. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने याप्रकरणी आपण काहीही मदत करू शकत नाही. या प्रकरणी आपण शेण आहोत, असे ते म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले होते. त्यावर कोणी आपल्याला शेण म्हटल्यास राग येत नसून अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट केले होते.

केरळच्या नागरिकांना गोधनाचे महत्त्व पटवण्याचे कार्य गो संरक्षण यात्रा करणार आहे. गोधनाबाबत आणि गायींच्या संरक्षणाबाबत यामुळे जनागृती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही यात्रा या वर्षअखेरीपर्यंत चालणार आहे. शेतकऱ्यांसाठी गोधन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे गायींच्या संरक्षण आणि संगोपन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहनही गोपी यांनी केले आहे.