
<<केशव आचार्य>>
अमेरिकेने मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याला ३५ वर्षांची शिक्षा केली आहे. परंतु हल्ल्याला मदत करणारे काही स्थानिक लोक हिंदुस्थानातच अजून मोकाट आहेत आणि त्याबाबत आपला देश मात्र अजून उदासीन दिसतो आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा तपास सुरू करून त्यांच्यावर खटला भरण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या सरकारने तरी आयएसआयच्या मदतनिसांचा शोध घेणे अत्यावश्यक आहे.
मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नुकतेच मान्य करून मोठीच खळबळ उडवून दिली. त्यानुसार दिनांक १६ मे रोजी पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयात ‘२६/११’ हल्ल्याबाबत खटला पुन्हा सुरू झाला आहे. यावेळी खटल्यातील शेवटच्या दोन पाकिस्तानी साक्षीदारांना समन्स पाठवण्यात आले होते. गतवर्षी ६८ पाकिस्तानी साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. पुढच्या सुनावणीच्या वेळी सरकारने २७ हिंदुस्थानी साक्षीदारांना बोलावण्याची व्यवस्था करावी म्हणजे खटला लवकर निकालात काढता येईल, असे न्यायालयाने बजावले आहे.
अमेरिकेने मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याला ३५ वर्षांची शिक्षा केली आहे. परंतु हल्ल्याला मदत करणारे काही स्थानिक लोक हिंदुस्थानातच अजून मोकाट आहेत आणि त्याबाबत आपला देश मात्र अजून उदासीन दिसतो आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा तपास सुरू करून त्यांच्यावर खटला भरण्याची आवश्यकता आहे. मुंबईवरील ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या अबू हमजा (जिंदाल) ऊर्फ झबिउद्दिन अन्सारी हा सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. हल्ल्याच्या वेळी तो हिंदुस्थानात नव्हता. कराचीहून १० पाकिस्तानी दहशतवादी बोटीने समुद्रमार्गे निघाले त्यावेळी त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी तो कराची बंदरावर हजर होता. त्याने हल्ल्यामधील १० दहशतवाद्यांना हिंदी आणि उर्दू शिकविले. म्हणजेच हल्ल्यापूर्वी अनेक दिवस तो पाकिस्तानमध्ये होता. या अबू जिंदालकडे चौकशी केली आणि त्याच्यावर ब्रेन मॅपिंग व नार्को अनलायसिस टेस्ट केल्यास ‘२६/११’ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सर्व स्थानिक मदतनिसांना अजूनही पकडता येईल.
या हल्ल्यात स्थानिक मदतनिसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले होते आणि त्यामुळे स्थानिक मदतनिसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु स्थानिक मदतनिसांच्या सहभागाशिवाय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही, असे अनेक पोलीस अधिकारी म्हणतात. ताज हॉटेलमधील धुमश्चक्रीत दहशतवादी सर्वत्र एखाद्या माहीतगाराप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे चुकवून फिरत होते. मॅनेजरच्या फ्लॅटमध्ये बरोबर घुसून दहशतवाद्यांनी त्याला ठार मारले. १० दहशतवाद्यांकडे हिंदुस्थानात बनवलेली ओळखपत्रे होती.
मुंबई पोलिसांनी त्यावेळी स्थानिक मदतनिसांची बरीच माहिती शोधून काढली होती. ते म्हणाले होते, फहिम अहमद अन्सारी (वय ३५ वर्षे) आणि सबाहुद्दिन अहमद शब्बीर नावाच्या लश्कर-ए-तोयबाच्या हस्तकांनी हल्ले करण्याच्या सर्व ठिकाणांचे नकाशे हल्ल्याच्या बरेच दिवस आधी पाकिस्तानमध्ये पाठवले होते. त्यासाठी फहिम अन्सारी हा डिसेंबर २००७ ते जानेवारी २००८ या काळात साहिल पावसकर या नावाने मोतिलाल नगर, गोरेगाव येथे एक फ्लॅट भाडय़ाने घेऊन रहात होता. या दोघांनी पुरवलेल्या नकाशांमुळेच दहशतवाद्यांना हव्या असलेल्या ठिकाणांवर हल्ले करणे सोपे गेले. या दोघांनी ताज महाल हॉटेल, ट्रायड्रेंट हॉटेल इत्यादी १२ महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी केली होती. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी फहीम अन्सारीला पकडल्यानंतर एटीएसच्या ताब्यात दिले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर मोठा हल्ला करण्याची लश्कर-ए-तोयबाची तयारी चालू आहे, असे अन्सारीने सांगितले. तो पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात ६ महिने होता. फहिम अन्सारी आणि सबाहुद्दीन सिद्दिकी शेख या दोघांना पोलिसांनी पकडलेही, परंतु पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना सोडून दिले. (कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या जामिनाला दहा वर्षे सतत विरोध करणाऱ्या तपास यंत्रणांनी यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा का जमवला नाही अथवा सादर केला नाही, याचे पी. चिदंबरम यांनी उत्तर द्यावे.)
अमेरिका आणि अन्य परदेशी लोक दहशतवादाबाबत जेवढे जागरूक आहेत तेवढे हिंदुस्थानी लोक नाहीत, अशी खंत ऑड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क या ब्रिटिश पत्रकारांनी ‘रेडिफ’ या संस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली. या द्वयीने खूप संशोधन करून “The Siege: The Attack on the Taj ” नावाचे पुस्तक २०१३ मध्ये लिहिले आणि ते पेंग्विन प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. दहशतवाद्यांचे दूरध्वनीवरील संभाषण, कसाबवरील खटला, शेकडो संबंधित लोकांच्या मुलाखती इत्यादी अनेक माहितीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. मुंबईवरील हल्ल्यात आयएसआयला मदत करणारी एक व्यक्ती दिल्लीत उच्चपदस्थ होती असे ऑड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्या व्यक्तीला त्यांनी ‘हनी बी’ (मधमाशी) असे संबोधले आहे. मुंबईतील मदतनिसांना त्यांनी ‘उंदीर’ म्हटले आहे. त्या मधमाशीबद्दल ठोस पुरावा नसल्यामुळे तिचे नाव दिलेले नाही, पण काही संशय व्यक्त केले आहेत आणि एक ना एक दिवस ती व्यक्ती सापडेल असे म्हटले आहे. हिंदुस्थान सरकारने या ‘मधमाशी’चा आणि ‘उंदरां’चा शोध घेण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल लेखकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मधमाशीचा शोध घेऊ असे आश्वासन चिदंबरम नंतर गृहमंत्रीपदावर आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी दिले होते. परंतु नंतर त्यांनी ते पाळले नाही. सध्याच्या सरकारने तरी आयएसआयच्या मदतनिसांचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. आयएसआय आणि सिमी यांच्याविरुद्ध कारवाई केली म्हणूनच ले. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना (२००८) मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवले, असा आरोप आहे. एटीएसने त्यांच्या घरात स्फोटके आणून ठेवली, असे एनआयने न्यायालयात कबूल केले आहे. सैन्यदलात आयएसआयचा चंचूप्रवेश ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिवाजी महाराज देशद्रोह्याला तोफेच्या तोंडी देत असत. आपण नुसतेच शिवाजी महाराजांचे पुतळे उभारायचे काय? मालेगाव २००६ बॉम्बस्फोट कटातील सिमीच्या ज्या ९ मुस्लिम तरुणांविरुद्ध स्थानिक पोलीस, एटीएस, सीबीआय यांनी कारवाई केली होती त्यांना एनआयने सोडून द्यावे असा हुकूम चिदंबरम यांनी दिला होता.
अमेरिकेतील ‘११/९’ (२००१) हल्ल्यानंतर आणि लंडनमधील ‘७/७’ (२००५) हल्ल्यानंतर तेथील चौकशी समित्यांनी शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि ते सरकारला आणि तेथील जनतेलाही सादर केले. आपल्या सरकारने राम प्रधान समितीवर अनेक बंधने टाकून मर्यादित स्वरूपात अहवाल तयार करायला लावले. राम प्रधान समितीला सहकार्य करू नये, असे तत्कालीन सरकारतर्फे अप्रत्यक्षरीत्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितले होते, असेही सांगण्यात येते. राम प्रधान समितीने केवळ ६४ पानांचा अहवाल तयार केला. सरकारने त्यावरही उचित कारवाई केली नाही. मुंबईवरील हल्ला हे हिंदुस्थानविरुद्ध एक प्रकारचे युद्धच होय. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही.






























































