
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
‘एक तुतारी द्या मज आणुनी’ असे म्हणत संत आणि पंत काव्यात अडकलेल्या मराठी कवितेला मुक्त करणारे कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत यांचे मालगुंड येथील जन्मघर ‘स्मारक’ अक्षरशः मोडकळीस आले आहे. टेकू काढला तर हे स्मारक कोसळूनच पडेल अशी स्थिती आहे. भटक्या कुत्र्यांचा वावर आणि दरवाजांना लागलेली वाळवी पाहता केशवसुतांची माफी मागून म्हणावेसे वाटते, ‘एक झाडू द्या मज आणुनी, टाकीन स्मारक झाडूनी.’
मालगुंड येथील या स्मारकाचे 8 मे 1994 रोजी कुसुमाग्रजांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोकण मराठी साहित्य परिषदेकडे या स्मारकाची जबाबदारी असली तरी संधी मिळेल तेव्हा ‘विनोद’ करणाऱ्या सांस्कृतिक खात्यानेही या स्मारकाकडे पाठ फिरवली आहे. सरकारने स्मारक उभारणीसाठी निधी दिला असला तरी देखभाल करायची कुणी यावर सगळे गाडे अडले आहे.
केशवसुत स्मारक समितीचे कार्याध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी केशवसुत जन्मघराच्या दुरवस्थेची कबुली देताना या जन्मघराच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली असून आमदार उदय सामंत यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पाऊस थांबल्यानंतर हे दुरुस्तीचे काम आम्ही हाती घेणार आहोत, असे पाटील म्हणाले.
अवस्था भयानक
सध्या या स्मारकाची अवस्था दयनीय होत चालली आहे. केशवसुतांच्या जन्म घराच्या डाव्या बाजूला तर चक्क टेकू लावण्यात आला आहे. हा टेकू काढला तर ते ऐतिहासिक जन्मघर कोसळू शकते अशी अवस्था आहे. स्मारकात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. येणाऱ्या पर्यटकांना श्वानदंश होण्याचा धोका आहे. स्मारकात एक विस्तारित इमारत आहे त्या इमारतींची अवस्था उद्घाटनापूर्वीच भयानक झालीय. दरवाजाच्या एका कोपऱ्याला तर चक्क वाळवी लागलीय.
summary- keshavsut memorial is damaged condition





























































