
तटरक्षक दल आणि नौदलाच्या अत्याधुनिक ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरमध्ये दुरुस्ती आणि सुधारणा केली जाणार आहे. हे बदल टप्प्याटप्प्याने केले जाणार असून त्यानंतर सहा महिन्यांनी ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर तटरक्षक दलाकडे आणि नौदलाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
5 जानेवारी रोजी तटरक्षक दलाच्या एएलएच ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करणाऱया समितीने काही शिफारशी केल्या आहेत. ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरमधील नॉन रोटेटिंग स्वॅशप्लेट बेयरिंगच्या निर्माण प्रक्रियेत सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, जेणेकरून या हेलिकॉप्टरची क्षमता वाढेल. ही हेलिकॉप्टर्स खाऱया वातावरणात काम करतात. त्यामुळे त्यांना डेक लँडिंगच्या तांत्रिकी ताणाला तोंड द्यावे लागते.
तटरक्षक दल आणि नौदलाकडे सध्या 28 ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्स आहेत. येत्या काळात त्यांचे टप्प्याटप्प्याने मॅन्युफॅक्चरिंग अपडेट केले जाईल. त्यानंतर सहा महिन्यांत त्यांना लष्कराकडे सुपूर्द केले जाईल आणि उड्डाण करण्यास परवानगी दिली जाईल.
या वर्षी पोरबंदर येथे तटरक्षक दलाच्या ‘ध्रुव’चा अपघात झाला होता. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एएलएचने सर्व हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणास स्थगिती आणली.
‘ध्रुव’ हे स्वदेशी रूपात विकसित केलेले हेलिकॉप्टर आहे. एचएएलच्या वेबसाईटनुसार, जून 2024 पर्यंत एकूण 345 हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील 313 सशस्त्र दलासाठी होती. 2023 पासून चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा अपघात झाला आहे.


























































