पालिकेच्या शिशू वर्ग शिक्षिकांना मिळणार दुप्पट पगारवाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिशू वर्गात शिकवणाऱया शिक्षिकांना आता दुप्पट पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना दरमहा 10 हजार रुपये मिळतील. शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या शाळांमधील शिशू वर्गासाठी 2007 मध्ये नियुक्त केलेल्या 66 अर्धवेळ शिक्षकांना केवळ पाच हजार रुपये वेतन दिले जाते. या तुटपुंज्या रकमेमुळे मुंबईसारख्या महागडय़ा शहरात राहणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षिकांनी नोकरीही सोडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी 66 पैकी उरलेल्या 18 शिक्षिकांना 10 हजार रुपये पगार देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश नाईक यांनी प्रशासनाला दिले. शिवाय या शिक्षिकांना दरवर्षी 10 टक्के पगारवाढ करावी आणि केवळ 10 महिन्यांसाठी पगार न देता संपूर्ण वर्षभर पगार द्यावा असेही निर्देश यावेळी नाईक यांनी दिले. यावेळी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी आशा मोरे आदी उपस्थित होते.