खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या सुरक्षेत घोडचूक, तुरुंग अधिक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या 9 सहकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये घोडचूक करण तुरुंग अधिक्षकाला महागात पडले आहे. आसाम पोलिसांनी डिब्रुगड सेंट्रल तुरुंगाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक केली आहे. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि आसाम कैदी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीब्रुगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सिजल अग्रवाल यांनी  निपेन दासला गुरुवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती दिली.

सिजल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण तुरुंगातील सुरक्षेतील घोडचूक असल्याचे गेल्या महिन्यात समोर आले होते. याप्रकरणाची कसून तपास केला असता निपेन दासला अटक केली आहे. हे एक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरण आहे आणि ते एक तुरुंग प्रमुख आहेत. त्यामुळे ती त्यांची जबाबदारी आहे. याआधी आसामचे डीजीपी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी 17 फेब्रुवारी रोजी डिब्रूगड तुरुंगातील एनएसए तुरुंगातून बरेच बेकायदेशीर गॅझेट जप्त केल्याचा खुलासा केला होता. यामध्ये स्पाय कॅमेरा, स्मार्टफोन, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ आदींचा समावेश आहे. या तुरुंगात अमृतपाल सिंग आणि वारिस पंजाब दे शी संबंधित त्यांच्या अनेक साथीदारांना ठेवण्यात आले आहे. ज्ञानेंद्र सिंह म्हणाले होते, ‘तुरुंग कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कक्षाची झडती घेतली होती. या दरम्यान सिमसह स्मार्टफोन, कीपॅड फोन, टीव्ही रिमोट, स्पायकॅम, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ हेडफोन आणि स्पीकरसह अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर 20 फेब्रुवारीला डीजीपींनी स्वत: तुरुंगाला भेट दिली. त्यांनी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन बैठकही घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या. याशिवाय चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे या प्रदीर्घ तपासानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासाच्या अनेक फेऱ्यांनंतर तुरुंग अधीक्षकांना अटक केली आहे. त्याची आता चौकशी सुरू आहे. एवढेच नाही तर शुक्रवारी सकाळीही आणखी काही तुरुंग अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, ही एक सुरक्षेबाबतची गंभीर चूक आहे. याप्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होऊ शकते. अमृतपाल सिंगला गेल्या वर्षी पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याच्यावर एनएसए लादण्यात आले आणि त्याला आसाम तुरुंगात ठेवण्यात आले.