
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याजवळील धोकादायक ‘एस कॉर्नर’ने आज आणखी दोघांचा बळी घेतला. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाक कंटेनर बाजूच्या कठडय़ावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह दोघेजण ठार झाले. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
कंटेनरचालक सूरज हैदर शेख (वय 24) व क्लीनर विष्णू गोपाळ सूरनर (वय 22, रा. किलेगाव, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत. कोल्हापूरहून कल्याणकडे लोखंडी सळई घेऊन निघालेला हा कंटेनर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गाच्या बाजूच्या कठडय़ास धडकला. या अपघातात कंटेनर उलटून त्याचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अवजड वाहनांचा वेग धोकादायक
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग वाढत असतो. विशेषतः जड वाहनांचा वेग जास्त होत असल्याचे चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी वाहनावर ताबा ठेवणे जिकिरीचे होते. त्यामुळे हा वेग जीवघेणा ठरत आहे.


























































