
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी शिवारात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत शेतकरी विठ्ठल मारोती राठोड व विश्वनाथ होनाजी साळवे या दोन शेतकऱ्यांचे 80 हजारांचे नुकसान झाले. विठ्ठल मारोती राठोड शेतामध्ये पत्र्याच्या घरामध्ये पत्नीसोबत रहातात. शेतकरी विठ्ठल राठोड यांच्या शेतातील घराला अचानक आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य, तसेच शेतीची अवजारे जळून भस्मसात झाली. त्यांचे अंदाजे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले. तर विश्वनाथ साळवे यांचे शेतातील 30 हजार रुपयांच्या दोन हजार कडबा जळून भस्मसात झाला. या आगीत दोन शेतकऱ्यांचे सुमारे 80 हजार रूपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा खंडाळी सज्जाचे तलाटी व मंडळ अधिकारी नयनसिंह ठाकूर यांनी मंगळवारी पंचनामा केला असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

























































