
मदतीचा बहाणा करून तरुणीशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली सुरक्षा रक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. अनुरंजन काश्मीर एक्का त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित तरुणी ही खार परिसरात राहते. शनिवारी रात्री ती तिच्या मित्रांसोबत औषध आणण्यासाठी गेली होती. औषध घेऊन ती जात असताना एका सोसायटीसमोर त्यांची मोटरसायकलचे चाक खड्डय़ात रुतले. हा प्रकार तेथे डय़ुटीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. तो मदतीसाठी बाहेर आला. मोटरसायकल खड्डय़ातून बाहेर काढण्याचा बहाणा करून त्याने तरुणीला अश्लील स्पर्श करून नकोसे कृत्य केले.
त्या कृत्यामुळे तरुणी घाबरली. तिने याची माहिती तिच्या मित्राला दिली. त्यानंतर तिने अनुरंजनला त्या कृत्याबाबत जाब विचारला. तेव्हा त्याने त्या तरुणीशी हुज्जत घातली. घडल्याप्रकरणी तरुणीने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.