अब की बार जनता की कमाई पर किश्तों में लूटमार! इंधन दरवाढीवरून खरगे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेल्याचा उल्लेख करत केंद्र सरकार जनतेच्या कमाईची ‘हप्त्यांमध्ये लूट’ करत असल्याचा आरोप केला.

खरगे यांनी म्हटले की, पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचा कर वसूल करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला नाही. उलट त्या काळात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महसूल वसूल करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी केंद्र सरकारवर निवडणुकीच्या काळात वेगळा आणि निवडणुकांनंतर वेगळा दृष्टिकोन स्वीकारल्याचाही आरोप केला. संकटाच्या काळात सरकार निवडणुकांमध्ये व्यग्र होते आणि निवडणुकांनंतर जनतेला त्यागाचे धडे दिले जात असल्याची टीका त्यांनी केली.

खरगे म्हणाले की, गेल्या आठ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन वेळा वाढविण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानातील इंधनदर इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केला जात असला, तरी पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी करकपात व आर्थिक मदत जाहीर केली होती, असेही त्यांनी नमूद केले.

त्यांनी विविध देशांची उदाहरणे देत सांगितले की:

इटलीने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करून नागरिकांना दिलासा दिला.
ऑस्ट्रेलियाने उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोलच्या किमती सुमारे 17 रुपये प्रति लिटरने घटल्या.
जर्मनीने इंधनावरील कर कमी केल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर 17 ते 19 रुपये प्रति लिटरने कमी झाले.
युनायटेड किंगडमने घरगुती ग्राहकांना 100 पौंडांची तेल मदत दिली तसेच इंधन आणि वीजवरील कर कमी केले.
आयर्लंडने 250 दशलक्ष युरोंच्या मदत पॅकेजमुळे पेट्रोलच्या किमती सुमारे 0.15 युरो प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 0.20 युरो प्रति लिटरने कमी झाल्या.

या पार्श्वभूमीवर खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला की, इंधनदरवाढीतून मिळणारा पैसा नेमका कुणाकडे जात आहे? तसेच सरकार इतके तडजोडीचे का बनले आहे, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

पोस्टच्या शेवटी त्यांनी मोदी सरकारमध्ये ‘नेतृत्वाचे खरे संकट’ असल्याचा आरोप करत, हिंदुस्थानातील 140 कोटी नागरिकांना ही बाब आता समजली आहे, असे म्हटले.