
ना ओळख ना पाळख, ना नाते ना गोते, अशी परिस्थिती असताना दोन महिलांनी एकमेकींच्या पतीराजांचे प्राण वाचवले आहेत. या दोघींच्याही पतींचे यकृत खराब झाले होते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाची त्यांना गरज होती. मात्र रक्तगट जुळत नसल्याने त्यांना आपल्या पतींना यकृत देता येत नव्हते, परंतु दोघींचेही रक्तगट एकमेकींच्या पतींच्या रक्तगटाशी जुळले. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने मध्यस्थी करून त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांचा होकार आल्यानंतर यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या महिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही पतीराजांचे प्राण वाचले.
चिपळूण येथील व्यापारी महेंद्र गमरे आणि नांदेडमधील पवन ठिगळे हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते. दोन्ही रुग्णांना कावीळ, अवयवांना सूज येणे, पोट फुगणे, भूक न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यासारख्या समस्या होत्या. एका वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. महेंद्र गमरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये, तर पवन ठिगळे पुण्यातील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पत्नींचा आणि त्यांचा रक्तगट जुळत नसल्याने दोघांवरही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येत नव्हती. महेंद्र गमरे यांच्या पत्नी जुही यांचा रक्तगट पवन ठिगळे यांच्याशी जुळला, तर ठिगळे यांच्या पत्नीचा रक्तगट गमरे यांच्याशी जुळला. त्यानंतर दोघींनीही एकमेकींच्या पतींना यकृत दिले आणि दोघांचेही प्राण वाचले. ही शस्त्रक्रिया डॉ. शरणकुमार नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्वॅप प्रत्यारोपणामुळे रुग्णांचे प्राण वाचले
कुटुंबातील कोणाचाही रक्तगट समान नव्हता. यामुळे यकृत प्रत्यारोपणात विलंब झाला. दोन्ही रुग्ण गंभीररीत्या आजारी होते आणि त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मात्र स्वॅप प्रत्यारोपणामुळे हे प्रत्यारोपण शक्य झाले आणि या रुग्णांचा जीव वाचला. भूल देण्यापासून प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूममध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. दोन्ही रुग्णांना प्रत्यारोपणानंतर एक पोस्टऑपरेटिव्ह कोर्स देण्यात आला आहे, असे डॉ. शरणकुमार नरुटे यांनी सांगितले.