खारघरमध्ये ऐन पावसाळ्यात खडखडाट; सिडकोवर शेकडो महिलांचा हंडा मोर्चा

सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भरपावसाळ्यात खारघरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे चार हजार कुटुंबे वास्तव्य करीत असलेल्या स्वप्नपूर्ती वसाहतीला गेल्या आठवड्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन पावसाळ्यात घरात नाही पाणी… घागर उताणी रे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वप्नपूर्तीवासीयांनी आज सिडकोवर हंडा मोर्चा काढला. शेकडो माता-भगिनी या मोर्चात सहभागी झाल्या.

खारघरच्या काही भागाला नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर अर्ध्या भागाला सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी सोडले जाते. हेटवणेतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यापासून स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये पाणीपुरवठा

व्यवस्थित झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रहिवाशांनी आज सिडकोच्या रायगड भवन कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चेकऱ्यांनी सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चेकरी आक्रमक झाल्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बामणडोंगरीत पाणीबाणी

सिडकोने नव्याने बांधलेल्या बामणडोंगरी रेल्वे स्थानकानजीकच्या प्रकल्पात हजारो कुटुंबांना घराचा ताबा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासूनही या वसाहतीत पाणी येत नाही. याचा सर्वाधिक फटका इमारत क्रमांक 19 आणि 18 ला बसला आहे. लागोपाठ आठवडाभर पाणी नसल्याने नव्याने वास्तव्याला आलेली शेकडो कुटुंबे हैराण झाली आहेत. ही वसाहत एल अॅण्ड टी कंपनीने उभा केली आहे. त्या कंपनीकडूनही पाणीपुरवठ्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे रहिवाशांचा संभ्रम झाला आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होणार

हेटवणे धरणातून येणाऱ्या पाइपलाइनवर खारपाडा परिसरात आपत्कालीन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे 9 ते 10 जुलैदरम्यान द्रोणागिरी, उलवे, खारघर आणि तळोजा येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. हे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. खारघरमधील स्वप्नपूर्ती वसाहतीला आता पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी व्यक्त केली आहे.