सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे. त्यामुळे पाकडे चांगलेच बिथरले आहेत. या मुद्द्यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दर्पोक्ती करत हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानने सिंधू नदीवर सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करून कोणतेही बांधकाम केले तर पाकिस्तान हिंदुस्थानवर हल्ला करेल, अशी दर्पोक्ती ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.

ख्वाजा आसिफ म्हणाले की, सिंधू नदीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे, हे सिंधू जल कराराचे उल्लंघन आणि पाकिस्तानविरुद्ध थेट आक्रमण मानले जाईल. आसिफ म्हणाले की आक्रमण केवळ तोफा डागून किंवा गोळीबार केल्याने होत नाही. त्याचे एक स्वरूप म्हणजे तुम्ही कराराचे उल्लंघन करत पाणी थांबवणे. त्यामुळे मोठ्या जनसंख्येवर त्याचा परिणाम होतो. तसेच तहान आणि भूक यांची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे हिंदुस्थानने सिंधू नदीचे पाणी अडवले तसेच तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले तर पाकिस्तान हल्ला करत ते बहांधकाम जमीनदोस्त करेल, अशी पोकळ धमकाही त्यांनी दिली.

पाकिस्तान सिंधू पाणी कराराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्याची योजना आखत आहे. पाकिस्तान हिंदुस्थानच्या या एकतर्फी निर्णयाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आव्हान देणार आहे. हिंदुस्थान सतत चिथावणी देण्याचे धोरण स्वीकारत आहे, परंतु पाकिस्तान फक्त प्रत्युत्तर देईल, ते पुढाकार घेणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या मनात असलेली कारवाईची धास्तीही उघड झाली आहे.