खेडमधील दहाजणांवर दोन वर्ष तडीपारीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या दहा गुन्हेगारांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी हि कारवाई केली. एकाचवेळी दहाजणांवर तडीपारीची कारवाई होण्याची हि जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. कारवाई करण्यात आलेल्या गुंडांच्या विरोधात खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपोषण आंदोलन छेडण्यात आले होते.

खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणारे दिनकर उर्फ बारक्या नागनाथ लोहार, सुरेश प्रकाश लोहार, प्रभाकर नागनाथ लोहार, बाळाजी रामा लोहार, माणिक नागनाथ लोहार, मोहन शांताराम लोहार, नागनाथ नारायण लोहार, अमोल प्रकाश लोहार रा सर्व उसरेवाडी, भडगाव, मूळ उस्मानाबाद, अनिकेत अनंत खेडेकर, अजय विठोबा चव्हाण, यांचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.

सन 2009 पासून खेड पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवीत असल्याने त्यांना प्रतिबंध होण्या करीता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येथील पोलीस पोलीस ठाण्याकडुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चेकलम 55 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला अनुसरून पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी वरील दहा गुन्हेगारांना रत्नागिरी जिल्ह्या मधुन 2 वर्षे कालावधी करीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश पारित केला. सदर आदेशाची 13 ऑक्टोबर रोजी खेड पोलीस ठाण्या मधून बजावणी करण्यात आली आहे.

1 जून रोजी खेड येथील दोन पत्रकारांना मारहाण व धमकी प्रकरणी यातील काही गुन्हेगारांचा समावेश होता. या प्रकरणी संशयित आरोपींवर कारवाई करून तालुक्यातील अवैध मटका व दारू धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी 20 जून रोजी प्रांत कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी संबंधित गुन्हेगारांवर हद्दपार करण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. वरील आरोपी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसुन आल्यास त्याबाबतची तात्काळ माहीती खेड पोलिस ठाण्यात देण्यात यावी असे आवाहन खेड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.