खेडला पावसाने झोडपले; दापोली मार्ग बंद, खाडीपट्टा विभागाचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे खेड शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नारंगी नदीचे पाणी दापोली नाका येथे रस्त्यावर आल्याने खेड दापोली, मंडणगड मार्ग वाहतुकीस बंद झाला. शिवाय खाडीपट्टा परिसराचा तालुक्याशी असलेला संपर्क देखील तुटला.

जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. हे पाणी मरण मार्केटपासून शहराकडे उसळी मारू लागल्याने या परिसरातील नागरिकांना, व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

दापोली मार्गावरील नारंगी नदीचे पाणी नदीकाठच्या शेतांना पोटाखाली घेऊन दापोली नाका येथे रस्त्यावर आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांची ही झोप उडाली. हा, मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला.

जगबुडी नदीची पाणी पातळी आज सकाळी 7.30 वा. 7.20 मीटर इतकी होती. या नदीची इशारा पातळी ही 6 मीटर इतकी असून धोका पातळी ही 7 मीटर आहे. रात्री धुवाँधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजिवन ही विस्कळीत झाले.