
खेड तालुक्यातील मांडवे येथील एका शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी या रोगाच्या सदृश्य लक्षणे आढळून आली असल्याने या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे पथक मांडवे पंचक्रोशीत सक्रिय झाले आहे. तपासणीसाठी संशयित जनावरांचे नमुने घेण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून या पंचक्रोशीतील 64 जनावरांचे तातडीने लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात लॅम्पची रोगाची लक्षणे असलेली जनावरे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यभरात शेतकर्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी या चर्मरोगाने खळबळ उडवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप या रोगाचा तितकासा प्रादुर्भाव आढळून आला नसला तरी दिनांक 21 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील मांडवे डिकेवाडी या ठिकाणी डोईफोडे नामक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी सदृश्य लक्षणे पशुसंवर्धन विभागाच्या तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. शुभांगी निंबोरे यांना आढळून आली.
त्यांनी तातडीने या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी लम्पी संशयीत जनावरांचे तपासणीसाठी नमुने संकलीत केले असून ते नमुने पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत स्पष्टता होणार आहे.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मांडवे पंचक्रोशीतील 64 जनावरांना गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुधन विकास आयुक्त यांनी तालुक्यात सर्वत्रच क्लिन व्हॅक्सिनेशनचे आदेश दिले असून आगामी काळात सर्वच भागामध्ये जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लस प्राप्त होताच त्यांचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती डॉ. निंबोरे यांनी दिली.


























































