
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यात महाकाय मगरी विहार करत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पूरप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पुराचे पाणी मानवी वस्तीत घुसले तर या मगरी देखील मानवी वस्तीत येण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या देवणे डोहामध्ये महाकाय मगरींचा वावर आहे. देवणे डोहातील मगरी अनेकदा खडकावर येऊन पहुडलेल्या नजीकच्या ग्रामस्थांनी पाहिलेल्या आहेत. नदीकाठी असलेल्या भोस्ते, अलसुरे, निलिक या गावातील शेतकरी जेव्हा पाळीव जनावरे घेऊन नदीवर जात तेव्हा खडकावर पहुडलेल्या मगरी पटापट डोहात सूर मारून गायब होतात. येथील शेतकऱ्यांसाठी हे आता नित्याचेच झालेले आहे. डोहावर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांनाही अनेकदा या मगरीचे दर्शन झालेले आहे.
बुधवारी खेडमध्ये कोसळलेल्या पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला होता या पुरामध्ये काही पाळीव जनावरे देवणे डोहामध्ये अडकून पडली होती. एका बाजूला खोल पाणी आणि दुसऱ्या बाजूला महाकाय मगरींचा वावर यामुळे नदीच्या पुरात अडकलेल्या पाळीव जनावरांपर्यंत पोहचण्यात एनडीएफआरच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या. अखेर जिवाची बाजी लावून या जवानांनी अडकलेल्या जनावरांना सुखरूप बाहेर काढले होते.
जगबुडी नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा नदीचे पाणी नदीकाठच्या भोस्ते, निळीक , अलसुरे या गावातील नागरी वस्तीमध्ये घुसते. त्याचप्रमाणे खेड बाजारपेठ देखील पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याबरोबर देवणे डोहातील महाकाय मगरी देखील नागरी वस्तीत येण्याची शक्यता असल्याने पूरप्रवरण क्षेत्रातील नागरिकांची झोप उडाली आहे.
जगबुडी नदीपात्रातील मगरींपासून उद्भवणारा संभाव्य धोका ओळखून वनविभागाने आवश्यक त्या उपायोजना कराव्यात, अशी मागणी पूरप्रवरण क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.


































































