खेड- गांजा विकणाऱ्याला सापळा रचून अटक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शहरालगतच्या भोस्ते जलालशाह गोहल्ला परिसरात गांजा या मादक पदार्थाची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मासुम मुनावर कालवे असे या 25 वर्षीय संशयिताचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांपासून खेड शहर व परिसरात गोठ्या प्रमाणात गांजाची नशा केली जात असल्याची चर्चा होती. तरुण पिढी या नशेच्या विळख्यात अडकली असल्याचेही बोलले जात होते.

तरुण पिढीला बरबाद करण्याऱ्या या व्यवसायाचे समूळ उच्चाटन होणे हे काळाची गरज आहे. पोलीस खात्याने त्यासाठी कंबर कसायला हवी. मात्र पोलीस याकडे तितक्याशा गांभीर्याने पहात नसल्याने या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

खेड व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची खबर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोस्ते जलालशाह मोहल्ला परिसरात सापळा रचून सुमारे 16 हजार रुपये किमतीच्या 800 ग्राम गांजासह मासूम याला ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या या कारवाईमुळे शहरालगतच्या सुनसान भागात घोळक्याने गांजासारख्या मादक पदार्थांची नशा करणाऱ्या नशाबाजांचे धाबे दणाणले आहेत.