निसर्ग चक्रीवादळामुळे खेडमध्ये 567 घरांचे नुकसान; हापुस आंब्याच्या बागाही उद्धवस्त

454

बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील सुमारे 567 घरांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. चक्रीवादळाचा फटका खाडीपट्टा परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत हाती आलेल्या पंचनाम्यांनुसार तालुक्यात सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे हापुस आंब्याची झाडेही उन्मळून पडल्याने आंबा बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यावर चक्रीवादळ येऊन धड़कले आणि बघता बघता होत्याचे नव्हते व्हायला सुरवात झाली. खाड़ी पट्टा परिसरातील पन्हाळजे, बहिरवली, शिशि, कोरेगाव संगलट, मुंबके, सुकदर, पीयनार या गावामध्ये तर चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले. आतापर्यंत झालेत्या पंचनाम्यानसार निसर्गाच्या या प्रकोपात या भागातील समारे 57 पक्क्या आणि 510 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यामध्ये घरावरील छपराचे पत्रे , कौले उडून जाणे, घरावर झाड कोसळल्याने घराची पडझड होणे. घरांच्या भिंती कोसळणे अशा घटनांचा समावेश आहे. महसूल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पाच गोठ्यांचही नुकसान झाले असून आतापर्यन्त झालेल्या पंचनाम्यांनुसार नुकसानीचा आकडा ३५ लाख इतका आहे.

अजुन काही गावातील पंचनामें बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे.
गेले दोन ते अडीच महिने येथील ग्रामस्थ कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. लॉकडाउनमुळे सारेच व्यवसाय बंद असल्याने ग्रामीण भागातील जनतेची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झालेली आहे. हाताला कामच राहिले नसल्याने पोट कसे भरायचे हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असतानाच निसर्ग वादळाचे आस्मानी संकट कोसळले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनासोबत जगल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून सर्वसामान्य जनता घराबाहेर पड़त असतानाच निसर्गाचे आस्मानी संकट कोसळस्याने सर्वसामान्यांची जगण्याची उमेदच हरवून गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या