
सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने आता जोरदार बरसायला सुरुवात केल्याने खेड तालुक्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी इतर कामे बाजूला ठेवून लावणीच्या कामात गुंतले आहेत.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणाऱ्या पावसाने यावर्षी शेतकऱ्यांना चांगलीच वाट बघायला लावली. 25 जून उजाडला तरी कोकणात मान्सून सुरु न झाल्याने पेरणीनंतर शेतात झालेल्या रुजवा (रोपे) करपण्याची भीती निर्माण झाली होती. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र 25 जूनच्या सायंकाळपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले. पाऊस सुरु होताच शेतकऱ्यांनी लावणीपूर्व मशागत म्हणजे शेताची फोड आणि बेर ही कामे करायला सुरवात केली. चार दिवसात लावणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण होताच शेतकऱ्यांनी लावणीच्या कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात शेतातून राजा-सर्जा बैलांचा हाकारा ऐकू येऊ लागला आहे.

























































