तळवट धरणाच्या अश्मपटलासह मुख्य भिंतीला धोका; दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ लक्ष देण्याची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील तळवट धरणाच्या मुख्य भिंतीसह अश्मपटलवार उगवलेली मोठमोठी झाडे पाटबंधारे विभागाकडून तोडली गेली नसल्याने धरणाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात हा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने तळवट धरणाच्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या डोक्यावर मृत्युची टांगती तलवार आहे.

गतवर्षी चिपळूण तालुक्यातील तीवरे धरण फुटून हाहाकार उडाला होता. धरण परिसरातील अनेकांचे संसार या घटनेने उद्धवस्त झाले होते. या दुर्घटनेतून जे बचावले ते एका वर्षानंतरही सावरलेले नाहीत. धरण दुर्घटना म्हणजे काय? याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. तीवरे दुर्घटनेनंतर पाटबंधारे विभागाने धडा घ्यायला हवा होता. जिल्ह्यातील अन्य धरणांना पावसाळ्यात कोणतीही बाधा पोचणार नाही यादृष्टीने धरणांची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र तळवट धरणाच्या अश्मपटलावर उगवलेली झाडे गेल्या वर्षभरात तोडण्यास पाटबंधारे विभागाला वेळ मिळालेला नसल्याने हा विभाग दुर्घटनांबाबत किती दक्ष आहे हे स्पष्ट होते.

उपलब्ध माहिती नुसार, या धरणाची घळभरण 2011 साली करण्यात आली. मात्र या धरणाच्या सांडव्याचे काम अद्याप पुर्ण झालेले नाही. विस्थापितांची परवड आजही सुरुच आहे. न्याय मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त गेली अनेक वर्षे टाहो फोडत आहेत. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला संबंधित अधिकाऱ्यांना वेळ नाही. धरणाची घळभरणी झाल्यानंतरच काही वर्षातच हे धरण खर्चल्याचे उघड झाले होते अश्मपटल कामाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित झाल्या होत्या. स्थानिक माध्यमांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर धरणाची सुरक्षा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी अश्मपटलाच्या दरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र त्यानंतर आज तागायत या धरणाची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून हाहाकार माजल्यानंतर तळवट धरण परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांची झोप उडाली होती. तीवरे धरण दुर्घटनेपासून धडा घेतलेला हा विभाग पाऊस संपताच धरणाची डागडु्जी करण्याचे काम हाती घेईल अशी अपेक्षा या ग्रामस्थांची होती. मात्र धरणाची डागडुजी सोडाच, अश्मपटल आंणि मुख्यभिंतीवर उगवलेली झाडेही मुळापासून तोडण्यास पाटबंधारे विभागाला वेळ मिळाला नसल्याने धरण परिसरातील ग्रामस्थांना या वर्षीही मृत्युची टांगती तलवार डोक्यावर घेऊनच जिवन कंठावे लागणार आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची पुनरावृत्ती खेड मध्ये होवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने जोराची पर्जनवृष्टी सुरु होण्याआधरीच आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी भितीच्या सावटाखाली वावरणारे ग्रामस्थ करत आहेत.