खोपोली नगर परिषदेला आंतरराष्ट्रीय दर्जा व्यवस्थापन मानांकन; कार्यपद्धतीत सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता

नागरिक केंद्रित सेवा, प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शकता या चतुःसूत्रीच्या आधारे खोपोली नगर परिषद लौकिकपात्र ठरली आहे. पालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जा व्यवस्थापन मानांकन (आयएसओ ९००१:२०१५) प्राप्त झाले आहे. नगर परिषदेच्या सेवांच्या गुणवत्ता वृद्धीकडे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

आरओएचएस सर्टिफिकेशन यांच्या वतीने हे प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज पाटील यांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे मानांकन प्राप्त झाले आहे. नगर परिषदेतील कार्यपद्धतीत सुधारणा, आधुनिक तंत्रांचा वापर, पारदर्शकता आणि नागरिक केंद्रित सेवा यावर विशेष भर देण्यात आला. या प्रमाणपत्राची वैधता ४ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार असून पहिली सर्व्हिलन्स तपासणी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आणि दुसरी तपासणी ५ नोव्हेंबर २०२७ रोजी होणार आहे. नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या मानांकनामुळे खोपोली नगर परिषद सक्षम होत आहे. या यशाबद्दल नगर परिषद प्रशासन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

या आधारे केले मूल्यमापन
आयएसओ प्रमाणपत्रासाठी मूलभूत सेवा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व वितरण, रस्ते देखभाल, सार्वजनिक प्रशासन तसेच परवाने, प्रमाणपत्रे जारी करणे या सेवांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.